Thursday, 30 April 2015

पहिला वाढदिवस चिमूचा...!!!


पहिला वाढदिवस चिमूचा...!!!


बघता बघता एक वर्ष संपलं... जणू काही ३६५ दिवसाचं एक स्वप्न पूर्ण झालं... चिमू तू आलीस आणि आमचं आयुष्य जणू फुलून निघालं... या एका वर्षात तू पुढील पूर्ण आयुष्यात आम्ही कधीही विसरणार नाहीत अश्या सुंदर आठवणी आम्हांला दिल्यास... तुझ ते टकमक पाहणं... तळहाताच्या मुठी आवळून हातवारे करणं... तुझं ते खरं रडणं आणि कधी कधी नाटकी रडणं... जवळ घेताच शांत होणं... तुझं ते कीडबिड बोलणं आणि वर्षाच्या आतच तुझं चालण्याच्या प्रयत्नात पडणं... सगळं काही मनमोहक मधुर अन कधी न विसारणारं...
           क्षितिजा... खरच तू रडत असतानाही मला हसावं वाटलं कारण तुझ रडणही तसच हळुवार आणि लाडिक होतं... तुझ्या प्रत्येक कृतीच्या आणि केलेल्या नखर्यांच्या पाऊलखुणा आमच्या मनावर उमटलेल्या आहेत... या एका वर्षात अनेक सुखद क्षण येऊन गेले ज्यांची मोजदाद होऊच शकत नाही... मोजदाद करण्याचा प्रयत्नही मी करणार नाही कारण मोजण्यापेक्षा जे उपभोगले तेच खरे आनंदाचे क्षण... हो या एक वर्षातील तुझ्यासोबतचे सर्व क्षण मी मनाच्या एका कोपर्यात कायमस्वरूपी कैद करून ठेवले आहेत... त्या गोड आठवणी आहेत माझ्यासाठी... माझ्या पुढील आयुष्यासाठी...
           चिमू तू हळूहळू तुझी एकेक लीला दाखवत आहेस आणि आम्ही ते पाहून हरखून जात आहोत... हातांच्या इशार्यासह तुझे पापा, बाबा, मामा, हे तोतरे शब्द ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे... रांगत तू जेंव्हा घरभर फिरतेस तेंव्हा तुझ्याकडे बघत बसावे वाटते... दिवसभर बाहेर कितीही थकून आलो तरी घरी तुझ्या हसतमुख चेहऱ्याकडे पहिले की सर्व शीण दूर होतो एवढी ताकत तुझ्या हास्यात आहे... आयुष्याच्या साऱ्या चिंता आणि जगाला विसरायला लावेल एवढी ताकत तुझ्या पैंजणाच्या किणकिणात आहे...
           एक बाहुली, परी, फुलपाखरू.... काय उपमा देऊ तुला चिमू... पाहता पाहता एक वर्षाची झालीस... आमच्या घरातील चैतन्याच्या रूपातील तू अशीच हसत खिदळत मोठी होत राहा आणि आमच्या आनंदात भर टाकीत जा...