Saturday, 29 November 2014

बालाजी जाधव प्राथमिक शिक्षणाला नवी उंची मिळवून देणारा शिक्षक

                 बालाजी जाधव लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगावी या गावचा हा तरुण, बारावी झाल्यानंतर लगेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागलेला एक तरुण मुलगा परंतु अचानक आपण प्राथमिक शिक्षक व्हावे असे ठरवून डी. एड. करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती (म्हसवड ) तालुका माण जिल्हा सातारा या शाळेत २००६ साली हा तरुण प्राथमिक शिक्षक पदावर रुजू झाला. हि शाळा ग्रामीण भागातील आणि द्विशिक्षकी असली तरी हाकेच्या अंतरावर तालुक्यातील सर्वात चांगली म्हणून ओळखली जाणारी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. परंतु पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपली मुलं न घालता ती शिंदेवस्ती या शाळेत दाखल होऊ लागली कारण त्या शाळेच्या तुलनेत हि शाळा कोठेही कमी पडत नव्हती. या शाळेतील मुलेही इंग्रजीत संवाद साधत होती. त्यामुळे पालकांचा या शाळेवरील आणि पर्यायाने बालाजी जाधव या शिक्षकावरील विश्वास सार्थ आणि दृढ होत चालला होता. या शाळेत इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण घेऊन मुले ५ वी साठी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतात यावरून आपण शाळेची गुणवत्ता समजू शकतो. 

                         आपल्या शाळेतील मुले शिष्यवृत्ती परीक्षेत नुसती पास न होता ती शिष्यवृत्तीधारक कशी होतील यासाठी या तरुणाने खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ म्हणजे या शाळेतील एकतरी विध्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती धारक असतोच असतो... शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लागणाऱ्या भरपूर युक्त्या आणि क्लृप्त्या या शिक्षकाने शोधून काढल्या सरावासाठी अनेक प्रश्नपत्रिकांची निर्मिती त्याने केली. बालाजी हा धडपड्या शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या शाळेतील विध्यार्थ्यांबरोबरच आपल्या केंद्रातील विद्यार्थीही शिष्यवृत्तीधारक झाले पाहिजेत या उद्देश्याने केंद्रातील सर्व शाळांतील हुशार विद्यार्थी निवडून त्यांनाही मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि या कामातही त्याला अपेक्षित यश संपादन करता आले. हळू हळू ४ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून बालाजी जाधव याचे तालुक्यात नाव झाले. यानंतर तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्याचे ठरवण्यात आल्यानंतर त्या परीक्षेचे सर्व विषयाचे सराव पेपर तयार करण्याचे काम अर्थात बालाजी जाधव याच्याकडेच देण्यात आले.
                          हा धडपड्या शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही. ठरवून शिक्षण क्षेत्रात आलेला आणि प्राथमिक शिक्षणात काहीतरी मोठे काम करण्याचा मानस असलेला हा तरुण शिक्षक एवढ्यावर थांबने शक्य नव्हते आपल्या ज्ञान व कौशल्याचा वापर महाराष्ट्रातील इतर शिक्षकांना व्हावा या उद्देशाने या शिक्षकाने स्वतःचा crcmhaswadno3.blogspot.in या नावाने एक blog तयार करून त्याद्वारे शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन, समस्या निराकरण, सूत्रे, युक्या, क्लृप्त्या, सरावासाठी प्रश्न तसेच online व offline टेस्ट इत्यादी... असा एक शिष्यवृत्ती संदर्भात ई खजिनाच सर्व महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी खुला करून दिला. यासाठी त्याने कोणतेही शुल्क घेतले नाही हे विशेष. प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक व विध्यार्थानिसाठीची तळमळ असणारा शिक्षकच एव्हडे मोठे काम निशुल्क करू शकतो.
  
                        यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या शिक्षण विकास मंचने यावर्षीचा सर्वोत्कुष्ट शैक्षणिक blog म्हणून या ब्लॉगचा सन्मान केला आहे. आणि तो खरोखरच योग्य आहे. हा पुरस्कार मिळाल्यापासून बर्याच शिक्षक मित्रांनी फोन करून whats up आणि मेसेज करून मलाही शुभेच्छा दिल्यात (अगदी मी हा लेख लिहित असतानाही मला दोन फोन आलेत) आणि त्या मी स्वीकारल्या कारण मित्राचा सन्मान म्हणजे माझाही सन्मानच नाही का ? हो बालाजी आणि मी चांगले मित्र आहोत आणि बर्याचदा अनेक कार्यक्रमानमध्ये आणि कार्यशाळेमध्ये आम्ही सोबत असतो पण मी नम्रतापूर्वक इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो कि crcmhaswadno3.blogspot.in या blog च्या यशामध्ये बालाजीने crcmardi.blogspot.in या blog पासून घेतलेली प्रेरणा याव्यातिरिक्त माझा कसलाही वाटा नाही. या ब्लॉगच्या यशासाठी बालाजीने अत्यंत कठोर मेहनत घेतली आहे.
                            तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात मन लाऊन काम करा एके दिवशी तुम्ही त्या क्षेत्रात शिवाजी महाराज असाल या मानसिकतेने काम करणारा अत्यंत मेहनती आणि सतत नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या या धडपड्या शिक्षक मित्राचा मला सतत अभिमान वाटतो...

No comments:

Post a Comment