Monday, 15 September 2014

मागे वळून पाहताना

आज जवळपास तीन महिन्यांनी मी माझा http://crcmardi.blogspot.in/ हा  ब्लॉग उघडून पाहतोय 
कारणही तसच आहे ...
परवा एका मित्राचा फोन आला आणि तो मला म्हणाला की अरे तीन महिन्यापासून तू काहीही  पोस्ट केले नाहीस ब्लॉगवर...  मी दचकलोच कारण मलाही माहित नव्हते की मी तीन महिन्यापासून ब्लॉगवर पोस्ट करत नाही ते... 
मी त्याला म्हटल हल्ली वेळ मिळत नाही रे, शालार्थ, यशदा ट्रेनिंग, mscert ट्रेनिंग, आणि घरात करता असल्याने घरातील सर्व जबाबदारी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी ज्यांच्यासाठी आहे ती माझी माझी शाळा आणि मुले....आणि तसही आता खूप सारे शैक्षणिक ब्लॉग सुरु झाले आहेत... माझ्यापेक्षाही चांगले आणि update असणारे...
काल आणखी एका मित्राचा फोन आला तो म्हणाला ठाऊक आहे फार व्याप वाढला आहे तुझा पण उद्या ब्लॉग ला  एक वर्ष पूर्ण होईल त्यानिमित्त लिही काहीतरी.... 
हा मला आणखी एक धक्का होता कारण बरीच मंडळी आपल्या ब्लॉग ला सतत भेट देत असतात हे यावरून सिद्ध होतं... मी त्याला प्रयत्न करतो म्हटल आणि फोन ठेवला... पण थोडा भूतकाळात डोकावलो खरच एक वर्षाचा काळ कसा निघून गेला कळले नाही 
मी गेल्या वर्षी १५ सप्टेंबर हा ब्लॉग चालू केला एक वेगळा प्रयोग, पहिला शैक्षणिक ब्लॉग, वेळ वाचवण्याचे तंत्र अश्या अनेक मथळ्याखाली अनेक वृत्तपत्रांनी या ब्लॉगची दाखल घेतली. यानंतर शैक्षणिक ब्लॉग तयार करण्यासाठी अनेक मित्रांनी पुढाकार घेतला आणि पाहता बरेच शाळांचे, केंद्रांचे, तालुक्यांचेही ब्लॉग तयार होऊ लागले..... आज  बघता बघता एक वर्ष झालं या एक वर्षाच्या काळात मागे वळून पाहत असताना बर्याच आंबट गोड आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या... 
या एक वर्षात, या ब्लॉगने मला व्यक्त व्हायला मदत केली. आजूबाजूला अनेक जण, अनेक नातेवाईक, मित्र मंडळी जरी असली तरी प्रत्येक वेळी ते सर्व "माझिया जातीचा" या सदरात मोडतातच असे नाही, त्यामुळे तो शोध तसा कायमच असतो. पण हा ब्लॉग माझी मनातलं काही सहज मांडायची गरज पूर्ण करतो. तशा अर्थाने ही माझी डायरीच... कोणालाही वाचायची परवानगी असलेली. त्यामुळे सुरुवातीला तो कोणी वाचतो की नाही याची मी फारशी दखल घेत नसे. पण नंतर लक्षात आले की माझ्या ओळखीतले अनेक जण तो वाचतात. प्रतिक्रिया पण देतात. कधी प्रत्यक्ष भेटीत, किंवा फोनवर आवर्जून तसं सांगतात ही.  अशा प्रतिक्रिया माझा उत्साह वाढवतात हे मात्र खरं.
संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जापायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच "आपुला हा संवाद आपणाशी" असाच चालू राहो.
या एका वर्षाच्या काळात मला ब्लॉग मुळे काय मिळाले असा विचार केला तर बरेच काही शिकायला मिळाले, अनेक चांगल्या व्यक्तींशी मी जोडला गेलो, अनेक चांगले मित्र मी कमावले, या ब्लॉगवरील माहिती चुकीची नसते हा विश्वास संपादन केला, flipkart.com या online शॉपिंग कंपनीची affiliate partnarship मिळाली, या ब्लॉग वरून आत्तापर्यंत २००००० पेक्षा जास्त किमतीची खरेदी झाली आहे...आणखीही बर्याच गोष्टी आहेत... खरे तर ब्लॉग ने  मला काय दिले हे शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे... पण मला काहीतरी मिळाले आहे नक्की... खरच या क्षणी मागे वळून पाहताना अनेक भावना मनात उत्पन्न होत आहेत... सुबोध क्षेत्रे यांची कविता मला याठिकाणी आठवते...
“मला समोरच्या वाटेची,
भीती नाही.
त्यावर मी चालेल,
धडपडत कसाही.
पण भीती दाटते,
वाटेवरील वळणावर..
मागे वळून पाहताना,
थरारते सर्वांग !
खूप काही ठेऊन मागे,
शिदोरी प्रसंगांची!
छातीवर बाळगूनी घाव ओले.
निघलो अगम्याच्या,
अनंत शोधास.
टाकूनी मागे आठवनींचे,
भलेमोठे गाठोडे.
वाटत नाही मनापासून,
पलटावे पान मागले..
अनुभवलेले,वाचून झालेले.
नकोसा वाट्तो,
छातीवर बांधलेला पाषाणासम्
तो अघटीत भूतकाळ.
म्हणून घे हात माझा,
तुझ्या बळकट हातात.
धीर दे मला;
मागे वळून पाहताना….
पुढची वाट संपवण्यासाठी…!

हो... निरपेक्ष भावनेतून केलेल्या  या कामाच्या बदल्यात मला जे समाधान मिळाले त्याचे मूल्य पैशात कधीच व्यक्त होऊ शकत नाही... आज मागे वळून पाहताना समाधानाची ही भावना मला तृप्त करणारी आणि चिरकाल आनंद देणारी आहे असे वाटते....