Monday, 9 December 2013

Todays thought and Moral Story

आजचा सुविचार 

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

आजची बोधकथा

राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा होता. राजाच्या रथाच्या पुढे मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते. सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या जनसमुदायामध्ये एक अंध संन्यासी पण उभा होता. त्याला या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तो रांगेतून बाजूला उभा होता. जेंव्हा वाजंत्रीवाले जवळ आले, तेंव्हा सैनिक ओरडू लागले, "सरका ! दूर व्हा! बाजूला व्हा!" अंध संन्यासी म्हणाला,"समजले !" मंत्र्याचा रथ आल्यावरही त्याने संन्याशासहित सर्वाना तसाच दूर होण्याचा आदेश सुनावला. संन्याशी परत उत्तरले,"समजले". असेच सर्व सेनापतीचे रथ येताना झाले, त्यावेळेसही सैनिकाचे आणि संन्याशाचे वरीलप्रमाणेच म्हणणे आले. सर्वात शेवटी राजाचा रथ आला. संन्याशाला पाहताच राजा तत्काळ रथाच्या खाली उतरला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला,"आपण या गर्दीत येण्याचे का बरे कष्ट घेतले? आपण जर आज्ञा केली असती तर मी तुमच्या आश्रमात येवून तुमची भेट घेतली असती." संन्याशी या वेळीही म्हणाला,"समजले !!" राजाने संन्यासी वृद्धाला विचारले,"महाराज ! मी फारसे काही न बोलता आपण समजले असे म्हणता?" तेंव्हा संन्यासी म्हणाले,"आपल्या या सर्व लवाजम्यात मी फक्त आवाजावरून, उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून काही निष्कर्ष काढले, ते माझे बरोबर आले त्याला मी समजले म्हणत होतो. सैनिकाचा, सेनापतीचा,मंत्र्याचा वेळेचा सूर हा वेगळा होता आणि मृदू आवाज हा केवळ राजाचा असू शकतो याची मला खात्री होती. राजा मनातून काय समजायचे ते समजला. त्याने त्या अंध संन्याशाला रथातून आश्रमात सोडण्याची व्यवस्था केली.

तात्पर्य-

विनम्रतेतून महानता प्रकट होत असते. त्यामुळे कितीही उंची मिळाली तरी अहंकारापासून दूर राहता आले पाहिजे. 


No comments:

Post a Comment