Tuesday, 29 October 2013

एस.टी. चा प्रवास झाला स्वस्त, चला सहल करुया मस्त !

शालेय जीवन...सहल...आणि एस. टी. यांचे एक अतूट नाते आहे. ऐरवी बहुतांशी वेळा शाळेला जाण्या - येण्यासाठीच विद्यार्थ्यांच्याकडून एस. टी. चा प्रवास घडत असतो. एस. टी. ची वाट पाहणे किंवा गर्दीत धक्का बुक्कीत एस. टी. चा प्रवास करणे या पलीकडे एस. टी शी शालेय विद्यार्थ्यांचा फारसा संबंध येत नाही. परंतु याला अपवाद आहे तो फक्त सहलीचा ! कारण सहलीच्या निमित्ताने हक्काच्या सिटवर बसून केलेला सुखद प्रवास कोणला नाही आवडणार! समोरचा वळणावळणाचा रस्ता... मागे पळणारी झाडे, सोबत धावणारी दुरवरची डोंगर शिखरे... गाण्यांच्या भेंडया... नविन प्रदेश... नवीन ठिकाणच्या भेटी... निसर्गाच्या अविष्काराचा आस्वाद आणि भरपूर मौजमजा ! असे हे सुंदर समिकरण... निव्वळ अप्रतिम !


विद्यार्थ्यांना नविन जगाची ओळख व्हावी त्यांनी पाठा...लेखातून पुस्तकांतून वाचलेली, शिक्षकांनी वर्णन करुन वर्गात शिकविलेली ऐतिहासिक, धार्मिक ठिकाणे, स्थळे प्रत्यक्ष पाहता यावीत त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, परंतु ही भर पडतांना त्यांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लीत होऊन विद्यार्थ्यांचे मानसिक व शारिरीक आरोग्य सुधारावे या हेतूने शाळेच्यावतीने या शैक्षणिक सहलेचे दरवर्षी आयोजन केले जाते. तर विद्यार्थी या सहलींची अगदी आतूरतेने वाट पाहत असताता. कारण त्यांच्यासाठी तो आनंदाचा... एक अविस्मरणीय क्षण असतो. वर्षभर काहिशा शिस्तीत वावरणारे विद्यार्थी सहलीच्या मुक्त वातावरणाला सुखावून जातात. त्यामुळेच मामाच्या गावाला घेवून जाणारी आगीनगाडी जशी लहानांना प्रिय असते, तशीच सहलीला घेऊन जाणारी एस. टी. शी ही त्यांचा जिव्हाळयाचा संबंध आहे.


आता तर एस. टी. च्या प्रासंगिक करारामुळे या सहली स्वस्त झाल्या असून सहल आयोजित करणाऱ्या शाळांना यामुळे जवळपास चार हजारांच्या खर्चात बचत होणार आहे. प्रासंगिक करारामुळे सहलीच्या निमित्ताने चालकाला द्यावा लागणारा अतिकालीक भत्ता आणि एस. टी. बसेसचा खोळंबा आकार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने माफ करण्यात आला आहे. त्यामुळे खर्चात बचत होऊन शालेय सहलीचा मार्ग आता आणखीनच सुकर झाला आहे. यामुळे 250 किलोमिटर पासून 1300 किलो मिटर पर्यंतच्या सहलीच्याप्रवासात जवळपास 4 हजार रुपयांची बचत होणार आहे. यापूर्वी 300 किलोमीटर अंतरासाठी शालेय सहलींना पूर्वी ज्या ठिकाणी 11 ते 12 हजार रुपये मोजावे लागत होते. त्या ऐवजी प्रासंगिक करारामुळे आता फक्त 8 हजार रुपयेच मोजावे लागणार आहेत. परिणामी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या तिकीटाच्या पैशात आपोआपच कपात होणार आहे.


एकूणच एस. टी. च्या शालेय सहलीचे तिकीट दर कमी करण्यात आल्यामुळे जिल्हयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ही खुषखबरच ठरली आहे. थोडक्यात एस. टी. चा प्रवास स्वस्त झाल्यामुळे सहल अजून मस्त होणार यात शंका नाही !
सौजन्य : mahanews