online खरेदी करणार असाल तर येथे एकदा जरूर पहा रु.१००० पर्यंत कॅश बॅक ऑफर

Thursday, 30 April 2015

पहिला वाढदिवस चिमूचा...!!!


पहिला वाढदिवस चिमूचा...!!!


बघता बघता एक वर्ष संपलं... जणू काही ३६५ दिवसाचं एक स्वप्न पूर्ण झालं... चिमू तू आलीस आणि आमचं आयुष्य जणू फुलून निघालं... या एका वर्षात तू पुढील पूर्ण आयुष्यात आम्ही कधीही विसरणार नाहीत अश्या सुंदर आठवणी आम्हांला दिल्यास... तुझ ते टकमक पाहणं... तळहाताच्या मुठी आवळून हातवारे करणं... तुझं ते खरं रडणं आणि कधी कधी नाटकी रडणं... जवळ घेताच शांत होणं... तुझं ते कीडबिड बोलणं आणि वर्षाच्या आतच तुझं चालण्याच्या प्रयत्नात पडणं... सगळं काही मनमोहक मधुर अन कधी न विसारणारं...
           क्षितिजा... खरच तू रडत असतानाही मला हसावं वाटलं कारण तुझ रडणही तसच हळुवार आणि लाडिक होतं... तुझ्या प्रत्येक कृतीच्या आणि केलेल्या नखर्यांच्या पाऊलखुणा आमच्या मनावर उमटलेल्या आहेत... या एका वर्षात अनेक सुखद क्षण येऊन गेले ज्यांची मोजदाद होऊच शकत नाही... मोजदाद करण्याचा प्रयत्नही मी करणार नाही कारण मोजण्यापेक्षा जे उपभोगले तेच खरे आनंदाचे क्षण... हो या एक वर्षातील तुझ्यासोबतचे सर्व क्षण मी मनाच्या एका कोपर्यात कायमस्वरूपी कैद करून ठेवले आहेत... त्या गोड आठवणी आहेत माझ्यासाठी... माझ्या पुढील आयुष्यासाठी...
           चिमू तू हळूहळू तुझी एकेक लीला दाखवत आहेस आणि आम्ही ते पाहून हरखून जात आहोत... हातांच्या इशार्यासह तुझे पापा, बाबा, मामा, हे तोतरे शब्द ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे... रांगत तू जेंव्हा घरभर फिरतेस तेंव्हा तुझ्याकडे बघत बसावे वाटते... दिवसभर बाहेर कितीही थकून आलो तरी घरी तुझ्या हसतमुख चेहऱ्याकडे पहिले की सर्व शीण दूर होतो एवढी ताकत तुझ्या हास्यात आहे... आयुष्याच्या साऱ्या चिंता आणि जगाला विसरायला लावेल एवढी ताकत तुझ्या पैंजणाच्या किणकिणात आहे...
           एक बाहुली, परी, फुलपाखरू.... काय उपमा देऊ तुला चिमू... पाहता पाहता एक वर्षाची झालीस... आमच्या घरातील चैतन्याच्या रूपातील तू अशीच हसत खिदळत मोठी होत राहा आणि आमच्या आनंदात भर टाकीत जा...

Wednesday, 17 December 2014

टेक्नोलॉजी फोर टीचर्स - शिक्षकांसाठी खास कोर्स

       २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे (Technology) शतक मानले गेले आहे ! आणि  कॉम्पुटरही तंत्रज्ञानाचा एक अविष्कार आहे ! आज आपणास प्रत्येक क्षेत्रात कॉम्पुटरचा मुक्त वापर होतांना दिसतो ! कॉम्पुटरच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ झाली आहेत ! 
      बँका, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, कारखाने, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, रुग्णालये, सरकारी-खाजगी कार्यालये सगळीकडे कॉम्पुटरचा वापर केला जातो. आणि आता शाळेतही कॉम्पुटरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली माहिती व कागदपत्रे संबधित कार्यालयात व्यक्तीशः न जाता इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्पुटरवर सहज उपलब्ध होतात. त्यामुळे शिक्षकांनी आता स्वतःचे परिश्रम व वेळ वाचवण्यासाठी इंटरनेट, संगणक तंत्रज्ञान (Technology) या सर्व बाबतीत अपडेट राहणे आवश्यक झाले आहे. परीक्षेचे व नोकरीचे अर्ज भरण्यापासून त्याच्या निकालापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत असतात. याकरिता कॉम्पुटरचे शिक्षण घेणे अतिशय महत्वाचे आहे. 
             पूर्वी ज्याला अक्षर कळत नसे त्यालाच निरक्षर म्हटले जाई, आता मात्र ज्याला कॉम्पुटर वापरता येत नाही त्यालाही निरक्षरच मानले जाते, इतका कॉम्पुटरचा प्रभाव वाढला आहे. कॉम्पुटरचे शिक्षण घेऊन त्याचा व्यवसाय वा नोकरी म्हणून निवड केलेले कित्येक लोक कमालीचे यशस्वी झालेले आढळतात. तसेच ज्यांनी आपल्या नोकरी व व्यवसायामध्ये संगणकाची जोड स्वीकारली ते लोकही आपल्या नोकरी मध्ये एक वेगळी छाप निर्माण करू शकले किंवा व्यवसायामध्ये कमालीचे यशस्वी झाल्याचे आपणास पहावयास मिळते. म्हणूनच कॉम्पुटर शिक्षणाला काळाची गरज मानले गेले आहे !
               आता शिक्षकदेखील संगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (Technology) यापासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी विशेषतः प्राथमिक शिक्षकांनी हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त अवगत करावे. आहे त्या ज्ञानात भर घालावी आणि जवळचे ज्ञान इतरांना वाटावे. या सद्हेतूने यशदा येथील तज्ञ मार्गदर्शक व्यंकटेश कल्याणकर आणि त्यांचे सहकारी यांनी खास शिक्षकांसाठी T4T (टेक्नोलॉजी फोर टीचर्स - शिक्षकांसाठी खास कोर्स) या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन यशदामध्ये केले आहे. शक्य होईल तेवढ्या शिक्षकांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा.